‘ऍसेट प्लस’वर नामनिर्देशिताची अतिरिक्त माहिती कशी जोडावी?
- rohanjagtap
- Jun 10
- 2 min read
सेबीच्या (सरकारी संस्था) नव्या नियमावलीनुसार आता नामनिर्देशित व्यक्तीची अर्थात नॉमिनीची यापुढे काही अतिरिक्त माहिती पुरवणे आवश्यक आहे. ही माहिती जोडल्याशिवाय आपल्याला कोणतीही नवी गुंतवणूक करता येणार नाही. भविष्यात आपली गुंतवणूक आपल्या नामनिर्देशित व्यक्तीला सहजतेने हस्तांतरित करता यावी, त्यात कोणतीही अडचण येऊ नये, याकरीता सेबी या सरकारी संस्थेकडून हे पाऊल उचलण्यात आलेले आहे. ‘ऍसेट प्लस’वर नामनिर्देशित व्यक्तीची अतिरिक्त माहिती कशी द्यावी? यासंदर्भातील माहिती मी पुढे देत आहे.
सर्वप्रथम आपला ‘ऍसेट प्लस’ हा अनुप्रयोग (ऍप) उघडा.
हा अनुप्रयोग उघडल्यानंतर समोरच आपल्याला ‘Important Notice’ दिसेल, ज्यात सेबीच्या नियमावलीप्रमाणे नामनिर्देशित व्यक्तीची माहिती अद्ययावत करणे आवश्यक असल्याचे सांगितलेले आहे. या सुचनेच्या खाली आपल्याला ‘Update Now’ हे बटण दिसेल. त्यावर जा.

Update Now वर जा आता मोबाईलवरील वेब ब्राऊजरवर एक अर्ज उघडला जाईल, ज्यात आपल्याला नामनिर्देशित व्यक्तीशी निगडीत अतिरिक्त माहिती देता येईल.

नामनिर्देशित व्यक्तीची अरितिक्त माहिती ‘नामनिर्देशित व्यक्तीचे नाव’ आणि ‘नामनिर्देशित व्यक्तीशी नाते’ आधीपासूनच दिलेले असेल. कारण ही माहिती आपण ऍसट प्लसवर खाते उघडताना दिलेली होती. आता आपल्याला नामनिर्देशित व्यक्तीची जन्मतारीख, ओळखपत्राचा प्रकार (पॅन, आधार, वाहन परवाना, पासपोर्ट), ओळखपत्र क्रमांक, विपत्र (Email), फोन क्रमांक, पत्ता, पिनकोड, शहर, देश अशी अधिकची माहिती द्यावी लागेल.

नामनिर्देशित व्यक्तीची अरितिक्त माहिती नामनिर्देशित व्यक्तीचे नाव आणि जन्मतारीख हे त्यांच्या पॅन कार्डवरील माहितीप्रमाणे आहे का? याची एकदा खात्री करून घ्या. तसे नसेल तर ते पॅन कार्डवरील नावाप्रमाणे आणि जन्मतारखेप्रमाणे करा. पॅन कार्डवरील नाव अथवा जन्मतारीख जर चुकीची असेल, तर प्रथम ती त्वरित योग्यप्रकारे अद्ययावत करा. त्यानंतर नामनिर्देशित व्यक्तीचे नाव, जन्मतारीख हे पॅनकार्ड प्रमाणे द्या.
नामनिर्देशित व्यक्तीचा पत्ता हा शक्यतो त्यांच्या आधार कार्डवरील पत्त्याप्रमाणे द्या. जर आपला आणि नामनिर्देशित व्यक्तीचा पत्ता जर एकच असेल, तर ‘Nominee address is same as holder' या पर्यायाची निवड केली तरी चालेल. त्यानंतर नामनिर्देशिताचा पत्ता हा आपल्या पत्त्याप्रमाणे भरला जाईल.
नामनिर्देशित व्यक्ती जर NRI असेल, अर्थात दीर्घकाळ भारताबाहेर रहात असेल, तर आपल्याला ‘My nominee is an NRI’ला टिक करावे लागेल. त्यानंतर ओळखपत्र म्हणून आपोआप ‘Passport’ निवडले जाईल आणि खाली आपल्याला नामनिर्देशित व्यक्तीचा पारपत्र (पासपोर्ट) क्रमांक द्यावा लागेल.
सरतेशेवटी ‘Include nominee details in all my statements of account (SOA)’ असा पर्याय दिसेल. त्याची निवड करा आणि Next या बटणार जा.
यानंतर नामनिर्देशिताच्या फोन क्रमांकावर आणि विपत्रावर एक ओटीपी येईल. तो देऊन सत्यापन करावे लागेल आणि त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल.

अशाप्रकारे नामनिर्देशित व्यक्तीची आवश्यक अशी अतिरिक्त माहिती ही आपल्या म्युच्युअल फंड खात्यात अद्ययावत करता येईल. यानंतर नवी गुंतवणूक करताना आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही.
